नगर-संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री चार वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावर दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
नगर-संभाजीनगर महामार्गावरील पांढरीचा पूल येथे मध्यरात्रीच्या सुमारास एक कंटनेर फर्निचर व हार्डवेअर दुकानात घुसला. यानंतर मागून येणारा ट्रक कंटेनरला धडकला. मग आयशर टेम्पो आणि भाजीचा टेम्पो मागोमाग येत या वाहनांवर आदळली. या अपघातात चार चालक गंभीर जखमी झाले आहेत.
ही सर्व वाहने सोलापूर नगरमार्गे संभाजीनगरकडे चालली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
पांढरीचा पूल घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर फर्निचर व हार्डवेअर दुकानात घुसला. यानंतर पाठीमागून येणारी तीन वाहनेही एकमेकांवर आदळली. या अपघातात दुकानाचेही मोठे नुकसान झाले आहे.