
अहिल्यानगर जिह्यात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये दहशत आहे. आता तर बिबट्यांचा शिर्डी विमानतळावर मुक्त संचार सुरू असल्याने खळबळ उडाली. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आलेल्या या विमानतळाच्या सुरक्षेचे वाभाडे निघाले आहेत. विमानतळ कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवासीही भयभीत झाले आहेत.
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून शेकडो भाविक दररोज विमानाने शिर्डीत येतात. मात्र, विमानतळ परिसरात मोकाट जनावरे आणि बिबट्यांचा मुक्त संचार बघायला मिळत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मादी बिबट्या आणि तीन-चार बछडे
आठ महिन्यांपूर्वी वन विभागाने विमानतळ परिसरातून एक नर बिबट्याला जेरबंद केले होते. पण मादी बिबट्या जेरबंद होऊ शकली नाही. मादी बिबट्याने तीन ते चार बछड्यांना जन्म दिला. रविवारी एका कारचालकाला मादी बिबट्या व तिचे बछडे दिसले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.