
आज या मंचावर सर्वच ‘आजी’ आहेत. मी एकटाच ‘माजी’ आहे. माझ्याकडे लक्ष द्या, माझंही पुनर्वसन करा, अशी खदखद अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखविली.
अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके यांच्याकडून पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी थेट शिर्डी मतदारसंघ गाठला. नगर जिह्यामध्ये जवळपास त्यांनी संपर्क बंद केला होता. आज नगरमधील भाजपच्या जाहीर कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. या कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह महायुतीच्या दहा पैकी आठ आमदार उपस्थित होते.
सुजय विखे म्हणाले, या मंचावर सर्वच ‘आजी’ आहेत, मी एकटाच ‘माजी’ आहे. माझ्याकडेही सर्वांनी लक्ष द्यावं आणि माझंही पुनर्वसन करावं, अशी मागणी केली. सुजय विखे यांच्या भाषणानंतर सर्व आमदारांनी महायुतीच्या यशात विखेंचा सहभाग मोठा असल्याने तुमचं पुनर्वसन निश्चित होईल, असे आश्वासन दिले. मात्र, विखे यांच्या मनातील खदखदीची चर्चा दिवसभर सुरू होती.