Nagar News : निकृष्ट कमाचा बळी! नगर-मनमाड रस्त्यावर कारने दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू

नगर जिल्ह्यातील नगर-मनमाड मार्गावर एर्टिगा कार आणि दुचाकीचा भयंकर अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील एका वयस्कर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. निकृष्ट रस्त्यांमुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

सदर घटना राहुरी फॅक्टरी येथीन नगर-मनमाड मार्गावरील सेल पेट्रोल पंपानजीक घडली. शिर्डीकडून शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या एर्टिगा (MH20FG7027) कारने फॅक्टरीकडून लोणीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास (MH17AS7622) जोरदार धडक दिली. या भयंकर धडकेत दुचाकी चालक रंगनाथ गंगाधर आरंगळे (वय 61) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर एर्टिगा कार तीन ते चार वेळा पलटी झाली. त्यामुळे एर्टिगामधील सुस्मिता संतोष पुष्टी (वय 46) या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तत्काळ राहुरी शहरातील लाईफ इन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकोन्स्टेबल बाबासाहेब शेळके दाखल झाले. तसेच रुग्णवाहिका घेऊन चालक रवी देवगिरे व पप्पू कांबळे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रंगनाथ आरंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेला, तर जखमींना राहुरीत उपचारासाठी घेऊन गेले. मिळालेल्या माहितीनुसार मृत रंगनाथ गंगाधर आरंगळे हे राहुरी फॅक्टरी वृदावंन कॉलनी जवळील आरंगळे वस्तीमधील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कामासाठी ठिकठिकाणी खोदून ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. नगर-मनमाड रस्त्याचे काम अतिशय संथगतीने व निकृष्ट पद्धतीने सूरू आहे. दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर अनेक निष्पाप बळी गेले असून आणखी किती बळी हा रस्ता घेणार, असा सवाल युवा नेते सुजित सुरेश वाबळे यांनी यावेळी उपस्थित केला.