Nagar News – नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

परतीच्या पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढले. कोपरगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. आज गोदावरी नदीपात्रात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सायंकाळी 7 वाजता 13 हजार 500 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आले, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. यामुळे गोदावरी नदी पुन्हा वाहू लागली आहे.

गणपती विसर्जनाच्या वेळी अवघे 800 क्यूसेक्स पाणी नदीपात्रात होते. गोदावरी नदी पात्रात गणपती विसर्जनालाही पाणी नसल्याने भाविकांना डबक्यांचा सहारा घ्यावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा गोदावरी पात्रात 13 हजार 500 क्यूसेक्स पाणी सोडले आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा वाहती झाली आहे.

यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच कृपा केल्याने नाशिक, नगर जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण 100% भरून वाहत आहेत. पाण्याची पूर्णपणे आबादानी झाली आहे. तालुक्यातील छोटे-मोठे जलाशय पाण्याने भरले असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. कोपरगावला पाणीपुरवठा आठ दिवसाआड केला जात होता, तो आता तीन दिवसात करण्यात येत आहे.