
महाविद्यालयीन तरुणाची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला. शिरूर-श्रीगोंदा तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या दाणेवाडीत ही घटना घडली. माउली सतीश गव्हाणे (19) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे अहिल्यानगरसह पुणे जिल्हा हादरला आहे.
माउली गव्हाणे हा दाणेवाडी गावाजवळच महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याची क्रूरपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणेच माउलीची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी गुह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. खून करणाऱ्या आरोपींनी कुठलाही पुरावा मागे न ठेवल्याने पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा कस पणाला लागला आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा वेळीच शोध न लावल्यास पुणे नगर महामार्गावर रास्तारोको करू असा इशारा सकल गोपाळ समाजाने दिला आहे.