Nagar News : सुखी संसाराचं स्वप्न अपूर्ण राहिलं! दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहीत जोडप्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली. बहिरू काळू डगळे (वय 25) आणि सारिका बहिरू डागळे (वय 22) असे मृत्यू झालेल्या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे. प्रॉपर्टीच्या वादातून हा सर्व प्रकार घडला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील खिरविरे गावाच्या विहिरीमध्ये बहिरू आणि सारिका यांचे मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, हे नवदाम्पत्य 30 जून रोजी कोणालाही न सांगता निघून गेले होते. त्यानंतर ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र ते कुठेही सापडले नाहीत. अखेर गुरूवारी (4 जुलै) खिरविरे येथील विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह एका कापडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर अकोले पालीस ठाण्याचे उपनिरीक्षक भूषण हांडोरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले व अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. मृत बहिरू डगळे यांचे मामा एकनाथ रामभाऊ कुलाळ यांनी प्रॉपर्टीच्या वादातून आपल्या भाच्याचा आणि त्याच्या पत्नीचा खून झाल्याचा दावा करत तक्रार दाखल केली आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर हत्या का आत्महत्या याचे उत्तर मिळेल. एकनाथ कुलाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.