Nagar News : बिबट्याच्या हल्ल्यात 5 शेळ्या ठार, शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान

अकोले तालुक्यातील उत्तरेकडील डोंगरगाव, हिवरगाव व गणोरे परिसरांमध्ये दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन व पाळीव जनावरांवर हल्ले करुन नुकसान केल्याच्या नवनवीन घटना रोज घडत आहेत. अशातच गणोरे शिवारातील अभिनवनगर परिसरातील सपरात बांधलेल्या 5 शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे.

सदर घटना बुधवारी (19 जून) पहाटेच्या सुमारास गणोरे शिवारातील अभिनवनगर परिसरात घडली. शेतकरी गोरख विष्णुपंत आंबरे यांच्या सपरात बांधलेल्या शेळ्यांवर अचानक हल्ला करून पाच शेळ्या ठार मारल्या. त्यामुळे या शेतकरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली असून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर बिबट्याने ठार मारलेल्या शेळ्यांचा पंचनामा करण्यात आला असून नुकसान भरपाई देण्याबाबत अहवाल वनक्षेत्रपालांना पाठविण्यात आला आहे.

दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे शेतकऱ्यांसह गृहिणी, वृद्ध, शेतमजूर व शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी भीतीदायक वातावरणामध्ये वावरत आहेत. डोंगरगाव, हिवरगाव व गणोरे परिसरात बिबट्याच्या संख्येत दिवसागणिव वाढ होत असताना दिसत आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात पिंजरे लावून बिबट्यांना ताबडतोब जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.