Nagar News – भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग, जलसाठा 91 टक्क्यांवर

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यातही चांगली वाढ झाली आहे. बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान भंडारदरा धरण 91 टक्के भरले. त्यामुळे जलसंपदा विभागाने प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

भंडारदरा धरणातून प्रवरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यापूर्वी विद्युतगृह क्रमांक एक मधून वीज निर्मितीसाठी 835 क्युसेक्स वेगाने पाणी जलाशयात सोडण्यात आले. बुधवारी (31 जुलै) सकाळनंतर धरणांमध्ये जमा पाण्याची आवक पाहिली तर, भंडारदरा धरण 91.57 टक्के, निळवंडे धरण 52.58 टक्के, आढळा धरण 93.02 टक्के भरले आहे. भंडारा धरण क्षेत्रात तुफान पाऊस पडत असल्यामुळे दुपारी चार वाजता पाणीसाठा 91 टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

धरणातील उन्नेन विहीरीतून विद्युतगृह क्रमांक एकमधून 835 क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आल्याने भंडारदऱ्यातून एकूण 1 हजार 439 क्यूसेक्सने विसर्ग सोडण्यात आला. यासह वाकी जलाशयातून कृष्णावंती नदीपात्रातील 789 क्युसेक्ससह प्रवाह निळवंडे धरणात जमा होतो. यामुळे निळवंडे धरणातील नवीन पाणी झपाट्याने वाढण्यास मदत होत आहे, अशी माहीती जलसंपदा विभागाचे भंडारदऱ्यातील शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली.