Nagar: लोकसभा मतदारसंघातील EVM व VVPAT मशीनची पडताळणी होणार, निवडणूक आयोगाचे आदेश

नगर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे निलेश लंके विजयी झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पराभव जिव्हारी लागला आहे. त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये आक्षेप घेतला होता व EVM मशीनची पडताळणी करावी अशी मागणी त्यांनी करून त्याबाबतचे पैसे भरले होते त्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. सुजय विखे यांनी जे आक्षेप आहेत त्याची पडताळणी करावी अशा प्रकारचे निर्देश दिले असून त्याबाबतचे पत्र येथील प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे सुजय विखे यांचा लंके यांनी सुमारे 29 हजाराने पराभव केलेला होता. या पराभवाची अनेक कारणे असली तरी दुसरीकडे मात्र EVM मशीन मध्येच काहीतरी गडबड झाली आहे असा आक्षेप विखे यांनी घेतला. निकाल लागल्यानंतर अवघ्या आठ दिवसांमध्ये त्यांनी येथे प्रशासनाकडे अर्ज करून त्याबाबतची रक्कम सुद्धा भरलेली होती. येथील जिल्हा प्रशासनाने या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोग व त्यानंतर केंद्र निवडणूक आयोगाकडे याबाबत सर्व माहिती पाठवलेली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सुजय विखे यांच्या या संदर्भामध्ये आलेल्या अर्जानुसार संबंधित EVM मशीन याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले असून त्याबाबतचे पत्र काल येथील प्रशासन प्राप्त झाले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

40 मतदान केंद्रांवर आक्षेप

नगर लोकसभा मतदारसंघातील 2026 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती. यातील 40 मतदान केंद्रांवरील EVM मशीनवर डॉ. सुजय विखे यांनी आक्षेप नोंदवला होता. यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातील 5, नगर शहर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत-जामखेड 5, पारनेर 10, श्रीगोंदा 10 या केंद्रांचा समावेश आहे.

उमेदवारांसमोर पार पडणार प्रक्रिया

निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या दिवशी उमेदवारांना मॉकपोलसाठी बोलावण्यात येणार आहे. त्यांच्यासमोरच सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. आक्षेप घेतलेल्या मशीनमधील मेमरी डिलीट केली जाईल.

त्यानंतर त्या मशीनमध्ये मतदान घेतले जाणार आहे. VVPAT व EVM मशीनवरील मतांची पडताळणी केली जाणार आहे.

दरम्यान जे पराभूत उमेदवार झालेले आहेत त्यांना जर निवडणुकीबद्दल आक्षेप घ्यायचा असेल तर दिनांक 19 तारखेपर्यंत त्यांना याचिका दाखल करता येऊ शकते असं सुद्धा आता पुढे आले आहे.