![onion](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/12/onion-696x447.jpg)
नाफेड कांदा खरेदीचा बहुचर्चित घोटाळा अखेर चव्हाटय़ावर आला आहे. नाशिकमधून खरेदी केलेला साडेपाच कोटी रुपयांचा कांदा परस्पर खुल्या बाजारात चढय़ा भावाने विकल्याने गोवा फेडरेशनच्या संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भाव वाढल्याने ग्राहकांना दिलासा देण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने सन 2023-24 मध्ये नाशिकमधून शेकडो टन कांदा खरेदी केला. सत्ताधारी नेत्यांशी संबंधित फार्मर्स प्रोडय़ूसर कंपन्यांमार्फत खरेदी दाखवून अनेक बोगस पंपन्यांनी स्वतःचे कोटकल्याण करून घेतले. अनेक तक्रारी झाल्यानंतर चौकशीचा फार्स करण्यात आला. आता हा घोटाळा रेकॉर्डवर आला आहे. गोवा फेडरेशनने नाशिकच्या नाफेड कार्यालयाकडून 22 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2024 दरम्यान साडेपाच कोटी रुपयांचा कांदा खरेदी केला. मात्र, तो गोवा फेडरेशनला गेलाच नाही. त्या कांद्याची परस्पर खुल्या बाजारात विक्री करून अपहार केला. साडेपाच कोटींच्या फसवणूकप्रकरणी गोवा फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशीनाथ नाईक यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामुळे घोटाळेबाज पंपन्यांचे धाबे दणाणले आहे.