कीर्तनात व्यत्यय आणल्याने शीख बांधव संतापले.. चलो चलो बाहर निकलो; ठाण्याच्या गुरुद्वारातून नड्डांना बाहेर काढले

मतांवर डोळा ठेवून ठाण्याच्या गुरुद्वारात गेलेले भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा व अन्य नेत्यांची आज चांगलीच फजिती झाली. नड्डा आणि त्यांचा लवाजमा अचानक आल्याने गुरुद्वारामध्ये सुरू असलेल्या भजन, कीर्तनात व्यत्यय आल्याने शीख बांधव चांगलेच संतापले. यावेळी भाविकांनी नड्डा यांना आता तुम्ही परत जा, आमची कीर्तनाची वेळ आहे. हे तुम्ही जे करत आहात ते चुकीचे आहे अशा शब्दांत सुनावत सर्वांनाच गुरुद्वाराबाहेर काढले. त्यामुळे जे. पी. नड्डा, आमदार संजय केळकर यांचे चेहरे अक्षरशः पडले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून निवडणुकांमध्ये प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन ‘इव्हेंट’ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांना नेटकऱ्यांनी फटकारले आहे.

विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगले आहे. भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतदारसंघातील अनेक ठिकाणी संजय केळकर लोकप्रतिनिधी म्हणून फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने यंदा त्यांना चांगलाच घाम फुटला आहे. दरम्यान संजय केळकर यांची सीट धोक्यात असल्याची जाणीव झाल्याने भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी ठाण्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. आज प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ठाण्यात आले होते. जे. पी. नड्डा यांना खूश करण्यासाठी ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त तीन हात नाका येथील गुरुद्वारामध्ये दर्शनाचा ‘प्लॅन’ केला. मात्र त्याचवेळी तेथे सुरू असलेला कीर्तनाचा कार्यक्रम विस्कळीत होत असल्याने संतापलेल्या गुरुद्वारामधील सेवकांनी भाजपच्या सर्व मंडळींना बाहेरचा रस्ता दाखवला.

स्टंटबाजी बंद करा !

गुरुद्वारातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनीदेखील ही बातमी दाखवल्यानंतर नागरिकांनी भाजप नेत्यांच्या स्टंटबाजीवर जोरदार टीका केली आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सुरू असलेले हे इव्हेंट बंद करा, अशा शब्दांत अनेकांनी सुनावले आहे.