राज्यातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्ज महाराष्ट्रात येते कुठून?, नाना पटोले यांचा संतप्त सवाल

पोर्शे कार दुर्घटनेनंतर ड्रग्ज व ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याआधी ड्रग्ज माफिया ललित पाटीलला याच ससून रुग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाल्याचे उघड झाले आहे. ससूनमध्ये सरकारच्या आशिर्वादाने अनेक विद्वान लोक बसले आहेत, असा घणाघाती आरोप करत ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

विधिमंडळात पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या मुद्यावर बोलताना नाना पटोले यांनी ड्रग्ज आणि ससून रुग्णालयावर भाष्य केले. पोर्शे कार दुर्घटनेतील आरोपीसंदर्भात फक्त दारु पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवून दोघांना चिरडले एवढाच मुददा नाही तर त्यात ड्रग्जचा पण संबंध आला आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले गेले.

कोण डॉक्टर अजय तावरे? त्याला कोणाचा आशिर्वाद आहे. या प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी कोणाचा राजकीय दबाव होता. फॉरेन्सिक लॅबचा उल्लेख झाला पण अजून त्याचा रिपोर्टच आला नाही तरीही क्लिन चिट देऊन टाकली गेली. ड्रग्जचा मुद्दा महत्वाचा आहे, हे ड्रग्ज महाराष्ट्रात गुजरातच्या मुंद्रा बंदरातून येते हे सर्वांना माहित आहे. आणि या ड्रग्जच्या विळख्यात तरुणपिढी बरबाद केली जात आहे. महाराष्ट्राला हा कलंक लागला आहे, यावर गृहमंत्री यांनी सभागृहात उत्तरे दिली पाहिजेत अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्यावर सरकारने तात्काळ कारवाई केली आहे. तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. पूर्वी बाहेरुन ड्रग आणावे लागत होते पण आता ते केमिकलपासून बनवले जातात, सरकारने त्यावरही कारवाई केली असून ड्रग्जच्या बाबतीत झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरु आहे. पोलिसांचा जर त्यात सहभाग आढळला तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.