आधी पत्नी अन् मुलाला गोळी घातली, मग स्वत: मृत्युला कवटाळलं; म्हैसूरच्या उद्योपगतीनं अमेरिकेत टोकाचं पाऊल उचललं

म्हैसूरच्या एका उद्योगपतीने अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे कुटुंबाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 24 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

म्हैसूरमधील हॉलोवर्ल्ड या रोबोटिक्स कंपनीचे सीईओ हर्षवर्धन एस. किक्केरी (वय – 57), त्यांची पत्नी श्वेता पन्याम (वय – 44) आणि त्यांच्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उद्योगपतीने आधी पत्नी व मुलाची हत्या केली आणि त्यानंतर स्वत: मृत्युला कवटाळले, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ही घटना घडली तेव्हा किक्केरी दाम्पत्याचा 7 वर्षाचा धाकटा मुलगा घराबाहेर असल्याचे त्याचा जीव वाचला, असेही पोलिसांनी सांगितले. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी त्यांना 911 या क्रमांकावर एक फोन आला होता. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ न्यूकॅसल येथील टाऊन हाऊसवर धाव घेतली. पोलिसांना किक्केरी दाम्पत्याचा आणि त्यांच्या 14 वर्षाच्या मुलाचा मृतदेह घरामध्ये आढळला, तर 7 वर्षांचा मुलगा घराबाहेर असल्याचे त्याची जीव वाचला. तपास पथकाला घराच्या खिडकीवर रक्ताचे डाग आढळले असून घराबाहेर रस्त्यावर एक काडतूसही मिळाले आहे. त्यामुळे पोलीस सर्वच बाजुने तपास करत आहेत.

कोण होते हर्षवर्धन एस. किक्केरी?

हर्षवर्धन एस. किक्केरी हे कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील रहिवासी होते. म्हैसूर येथे मुख्यालय असलेली रोबोटिक्स कंपनी हॉलोवर्ल्ड या कंपनीचे ते संस्थापक आणि सीईओ होते, तर त्यांची पत्नी श्वेता पन्याम ही कंपनीची सह-संस्थापक होती. 2017 मध्ये ते विदेशातून हिंदुस्थानात आले होते आणि त्यांनी हॉलोवर्ल्ड या कंपनीची स्थापना केली होती. मात्र कोरोना महामारीच्या काळात 2022 मध्ये ही कंपनी बंद झाली होती. त्यानंतर ते अमेरिकेत परतले होते.

पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती

हर्षवर्धन एस. किक्केरी यांनी म्हैसूर आणि अमेरिकेत शिक्षण घेतले होते. सिराक्यूज विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रिकट इंजिनियरमध्ये मास्टर्सची पदवी घेतली होती. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत असताना त्यांनी रोबोटिक्सवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्याकडे 44 आंतरराष्ट्रीय पेटंट होते. मायक्रोसॉफ्ट गोल्ड स्टार, इन्फोसिस एक्सलन्स अवॉर्ड, भारत पेट्रोलियम स्कॉलरशिप आणि अनेक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळाले होते. एकेकाळी हर्षवर्धन यांची लोकप्रियता खूप जास्त होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना हर्षवर्धन यांनी सीमा सुरक्षेसाठी रोबोट वापरण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. हर्षवर्धन यांनी मायक्रोसॉप्ट या कंपनीसाठीही काम केले होते.