थरकाप उडवणारी बातमी; चालता चालता नाचायला लावणाऱ्या ‘डिंगा डिंगा’ विषाणूचे युगांडामध्ये थैमान

चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला होता. या विषाणूमुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला. कोरोना विषाणूनंतर नवनवीन आजार आता डोकी वर काढत आहेत. यापैकी अनेकांची नावे तर आपण कधी ऐकलेलीही नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) कोरोनानंतर अनेक आजार पसरू शकतात असा इशारा दिला होता. आता दक्षिण आफ्रिकन देश युगांडामध्ये अशाच एका नव्या विषाणूने थैमान घातले आहे. ‘डिंगा डिंगा’ असे या विषाणूचे नाव असून याची लागण झालेल्या रुग्णांचा थरकाप उडत आहे.

युगांडातील बुंदीबुग्यो जिल्ह्यात जवळपास 300 लोकांना ‘डिंगा डिंगा’ विषाणूची लागण झाली आहे. यातील बहुतांश रुग्ण महिला आणि मुली आहेत. हा आजाराची लागण झालेल्यांना ताप येतो, शरीराचा थरकाप उडू लागतो आणि अशक्तपणाही जाणवतो. चालता चालताही अंगाचा थरकाप उडत असल्याने रुग्ण नाचतोय की काय असेच भासते.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डिंगा डिंगा विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना चालणेही अवघड जाते. रुग्णांचे शरीर कंप पावते, थरथरते. यामुळे या आजाराला युगांडातील स्थानिक भाषेत नृत्य करणे किंवा त्यासारखे तालावर थिरकणे असे म्हणतात. तर वैद्यकीय भाषेमध्ये समजावून घ्यायचे झाल्यास या आजारामुळे रुग्णाचा शरीरावरील ताबा सुटतो किंवा शरीर कंप पावते आणि त्यामुळे चालण्यात अडथळे निर्माण होतात. या आजारामुळे आतापर्यंत कुणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. मात्र आरोग्य अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

काय आहेत लक्षणे?

– शरीराचा थरकाप उडतो किंवा शरीर कंप पावते
– रुग्णाला तीव्र ताप येतो
– अशक्तपणा जाणवतो
– काही रुग्णांना अर्धांगवायूचा झटकाही येऊ शकतो
– चालताना शरीर थरथरत असल्याने अडथळे निर्माण होतात

सध्या या आजारावर अँटीबायोटिक्स दिल्या जात असून रुग्णांना बरो होण्यास एक आठवड्याचा कालावधी लागत आहे. अर्थात युगांडातील बुंदीबुग्यो जिल्ह्याबाहेर या आजाराचे रुग्ण आढळले नसल्याची पुष्टी डॉ. कियिता यांनी केली आहे. मात्र कांगो देशातील काही भागामध्ये एका रहस्यमय आजाराचे 394 रुग्ण आढळून आले असून 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.