म्यानमार, थायलंडमधील भूकंपात 150 ठार, 770 जखमी; किंकाळ्या, आक्रोश… 7.7 रिश्टर स्केलचे हादरे

म्यानमार आणि शेजारील थायलंड आज शक्तिशाली भूकंपाने हादरले. अनेक इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या, पूल आणि धरणांचे प्रचंड नुकसान झाले. 7.7 रिश्टर स्केलच्या या भूकंपात तब्बल 150 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तर 770 नागरिक जखमी झाल्याचे म्यानमारच्या मिलीटरी सरकारने म्हटले आहे. इमारती कोसळतानाचे, नागरिक सैरावैरा इकडे तिकडे धावत असल्याचे, किंकाळ्या, आक्रोश आणि रस्तोरस्ती नागरिकांची गर्दी जमल्याचे भयंकर आणि ह्दयद्रावक परिस्थिती दर्शवणारे फोटो, व्हिडीयो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

  • हिंदुस्थानात कोलकाता इंफाळ, मेघालय आणि ईस्ट कार्गो हिल येथे तर बांगलादेशात ढाका, चटगांवसह अनेक भागात 7.3 रीश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले.
  • रक्ताची मागणी वाढत आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू शकतो. मंडारय येथे अनेक रस्त्यांना, महामार्गांना तडे गेल्याचे फोटो, व्हीडियोही व्हायरल झाल्याचे म्यानमार सरकारने म्हटले आहे.

अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेमध्ये भूकंप लाल श्रेणीत

अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेमध्ये म्यानमार, थायलंडमधील भूकंप लाल श्रेणीत दाखवण्यात आला आहे. या श्रेणीअंतर्गत 10 हजार ते 1 लाख म्हणजेच 34 टक्के लोकांचा मृत्यू या भूकंपात होण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थानकडून शक्य ती मदत – नरेंद्र मोदी

भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या मदतीसाठी हिंदुस्थान पूर्णपणे तयार असून लागेल ती मदत पुरवण्यता येईल असे मोदी यांनी म्हटले आहे.आम्ही याबाबत आमच्या अधिकाऱयांना सज्ज राहाण्यास सांगितले आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमार आणि थायलंड सरकारच्या संपर्कात राहण्याबाबतही चर्चा केल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

हिंदुस्थान, बांगलादेश आणि चीनमध्येही धक्के

म्यानमार, थायलंडमध्ये आलेल्या शक्तीशाली भूकंपाचे धक्के हिंदुस्थान, बांगलादेश आणि चीनमध्येही जाणवले.भूकंपाचे धक्के जाणवू लागताच विविध ठिकाणी कार्यालयांमधून तसेच घरांमधून, इमारतींमध्ये नागरिक रस्त्यावर पळाले. थायलंडमध्ये प्रचंड नुकसान झाले. इमारती, घरे उद्ध्वस्त झाली. दरम्यान, थायलंडचे पंतप्रधान पाइतोंग्तार्न शिनवात्रा यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे.

33 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली

भूकंपामुळे थायलंडची राजधानी बँकॉक येथे 33 मजली निर्माणाधीन इमारत अक्षरशः पत्त्यासारखी कोसळली. या इमारतीचा व्हिडीयो आणि आजूबाजूचे नागरिक सैरावैरा धावतानाचा व्हिडीयो, फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी तब्बल 400 कामगार, अभियंते, अधिकारी काम करत होते. दुर्घटनेत 90 हून अधिक कामगार बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.