म्यानमारमधील भूकंपबळींचा आकडा 1,700 वर, रमजाननिमित्त नमाज सुरू असताना मशीद कोसळून 700 मृत्यू

म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपातील बळींचा आकडा तब्बल 1 हजार 700हून अधिक झाला असून इमारतींच्या ढिगाऱयाखालून मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती म्यानमार सरकारने आज दिली. रमजाननिमित्त शुक्रवारी नमाज पठण सुरू असताना मशीद कोसळून तब्बल 700 मुस्लीम नागरिकांचा मृत्यू झाल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

भूकंपात 3 हजार 400 जण जखमी झाले असून 300हून नागरिक बेपत्ता असल्याचे सरकारचे प्रवक्ता मेजर जनरल जॉ मिन तुन यांनी सांगितले. याआधी भूकंपात एकूण 1 हजार 644 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु अमेरिकेतील जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटल्यानुसार भूकंपबळींचा आकडा वाढतो आहे. भूकंपात एकूण 60 मशिदी उद्ध्वस्त झाल्याचे म्यानमार सरकारने स्पष्ट केले आहे. मशीद कोसळताना आणि नमाजा दरम्यान मुस्लिम नागरिक मशिदीबाहेर धावतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

हजारो इमारतींचे नुकसान, तीन रुग्णालये जमीनदोस्त

भूकंपात 515 इमारतींचे 80 ते 100 टक्के नुकसान झाले, तर 1 हजार 524 इमारतींचे 20 ते 80 टक्के आणि 1 लाख 80 हजार 1 इमारतींचे 20 टक्के नुकसान झाल्याचे गुड लॅबसाठीच्या मायक्रॉसॉफ्टच्या एआय अॅपने म्हटले आहे. तर तीन रुग्णालये पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून 22 रुग्णालयांचे अंशतः नुकसान झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.