
म्यानमारमधील भूकंपबळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज मृतांची संख्या 3,085 एवढी झाली आहे. नैसर्गिक संकट पाहता तेथील लष्कराच्या नेतृत्वातील सरकारने सशस्त्र गटांबरोबर सुरू असलेल्या संघर्षावर तात्पुरती बंदी जाहीर केली. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप 341 लोक बेपत्ता असून 4,715 लोक जखमी आहेत. मागील शुक्रवारी झालेल्या 7.7 रिश्टर स्केलच्या या भूकंपात गगनचुंबी इमारती आणि ब्रीज जमीनदोस्त झाले. भूकंपातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढिगाऱयामुळे बऱयाच ठिकाणी पोहोचणे कठीण असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, चार रुग्णालये आणि एक आरोग्य केंद्र भूकंपामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तर आणखी 32 रुग्णालये आणि 18 आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले.