म्यानमारमध्ये भूकंपातील मृतांची संख्या 1600 वर; मदतीसाठी हिंदुस्थानचे ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू

म्यानमार आणि थायलंड हे देश शुक्रवारी मोठ्या भूकंपाने हादरले. म्यानमारमधील भूकंपातील मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत यात 1644 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 3408 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या नैसर्गिक आपत्तीत हिंदुस्थानने म्यानमार आणि थायलंडला मदत पुरवली आहे. या देशांच्या मदतीसाठी हिंदुस्थानचे ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू झाले आहे. आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री ही जहाजे 40 टनांचे जीवनावश्य साहित्य घेऊन यंगून बंदराकडे निघाली आहेत.

म्यानमार आणि शेजारील थायलंड शक्तिशाली भूकंपाने हादरले. शुक्रवारी झालेल्या भूकंपाची क्षमता 7.7 रिश्टर स्केल इतकी होती. त्यानंतरही म्यानमारला भूकंपाचे धक्के बसत आहे. शनिवारी सकाळी अफगाणिस्तानात 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला. शनिवारी दुपारी पुन्हा म्यानमारला भूकंपाचे धक्के बसले असून त्याची तीव्रता 5.10 एवढी मोजण्यात आली.

भूकंपामुळे तिथे मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. आतापर्यंत 1644 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 3408 जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे 5.16 वाजता अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. जमिनीपासून 180 किमी खोलीवर झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी होती. म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपाच्या एका दिवसानंतर हा भूकंप आला आहे.

म्यानमार आणि थायलंडमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपांमुळे इमारती, पूल आणि बौद्ध मठ उद्ध्वस्त झाले. जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेल्या म्यानमारमध्ये मोठी हानी झाली आहे. विनाशकारी भूकंपाचा फटका बसलेल्या म्यानमारला हिंदुस्थानने 15 टन मदत साहित्य पाठवले आहे. हवाई दलाचे C-130J सुपर हरक्यूलिस विमान हिंडन एअर फोर्स स्टेशनवरून म्यानमारसाठी रवाना झाले आणि त्यात तंबू, स्लीपिंग बॅग्ज, ब्लँकेट, तयार जेवण, पाणी शुद्धीकरण करणारे यंत्र, स्वच्छता किट, सौर दिवे, जनरेटर सेट, आवश्यक औषधे (पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, कॅन्युला, सिरिंज, हातमोजे, कापसाच्या पट्ट्या, मूत्र पिशव्या इत्यादी) यांचा समावेश होता. तसेच आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री ही जहाजे 40 टनांचे जीवनावश्य साहित्य घेऊन यंगून बंदराकडे निघाली आहेत. संयुक्त राष्ट्रांनी म्यानमारमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी 5 दशलक्ष डॉलर्सची मदत केली आहे.