मी श्रीमंत झाल्यामुळे माझे जिवलग मित्र दुरावले; अमेरिकेतील कोट्यधीश महिलेने बोलून दाखवली खंत

पैसा असेल तर सर्व काही मिळते, असा समज जवळपास सर्वांचाच आहे, परंतु अमेरिकेत राहणाऱ्या सिल्विया कंग या महिलेची याउलट कथा आहे. सिल्विया मूळची चीनची आहे, परंतु ती आता अमेरिकेत स्थायिक झाली आहे. ती अमेरिकेतील हार्मोनल हेल्थ कंपनीची सह-संस्थापक आहे. तिच्या म्हणण्यानुसार, मी श्रीमंत नव्हते तर त्यावेळी माझे मित्र कधीही माझ्यासोबत बोलत असायचे, तासन्तास गप्पा मारत असायचे. परंतु आता माझ्याकडे भरमसाट पैसा आला. मी कोट्यधीश झाले. पण माझे जिवलग मित्र माझ्यापासून दुरावले आहेत. ते आता पूर्वीसारखे मनमोकळेपणाने बोलत नाहीत. भेटायचे असेल तर आधी विचारतात. एखाद्या कार्यक्रमात भेटतात. आधीसारखे हितगुज करत नाहीत. ते पूर्णपणे बदलले आहेत. भेट झाली तर त्या भेटीत प्रेम, आपुलकी कमी आणि आर्थिक व्यवहार जास्त असतो, असे तिने सांगितले.

आत्मिक समाधान शोधतेय

पैसे नव्हते त्यावेळी महागडे ब्रँड्सचे कपडे, गाडय़ा असायला हव्यात असे वाटायचे. त्यासाठी मी धडपड करायची, परंतु पैसा आल्यानंतर हे सर्व मिळाले. आता या सर्वांची किंमत वाटत नाही. मला आत्मिक समाधान कशात मिळेल, याचा शोध मी घेतेय, त्यामुळे मी नैसर्गिक वातावरणात रमण्याचा प्रयत्न करतेय, असेही ती म्हणते.

नाते बदलले

सिल्विया अजूनही आपला नवरा आणि मुलांसोबत एका मध्यमवर्गीयप्रमाणे राहते, परंतु तिच्या मित्रांमध्ये खूप बदल झाले आहेत. आधी मित्र अचानक कधीही भेटायला येत असत, परंतु आता ते पूर्वीसारखे येत नाहीत. ते माझ्यापासून दूर राहतात. मित्र कोणत्याही विषयावर बिनधास्त बोलायचे, परंतु ते आता बोलायला घाबरतात. हे नेमके कशासाठी झाले हे कळत नाही, परंतु मैत्रीतील नाते बदलले आहे, असे सिल्विया म्हणते.