माझी बॅंक खाती आहेत सील.. दहा कोटी कुठून येणार? ममता कुलकर्णी

महामंडलेश्वर या पदासाठी ममता कुलकर्णी हिने १० कोटी रुपये दिले असे तिच्यावर आरोप झाले. तिच्यावर झालेल्या सर्व आरोपांचं तिने खंडन केले आहे. या विषयावर अधिक बोलताना ममता कुलकर्णी म्हणाली की, “१० कोटी रुपये तुम्ही विसरून जा; माझ्याकडे सध्याच्या घडीला १ कोटी रुपयेही नाहीत. माझी बॅंक खाती सील आहेत, मला महामंडलेश्वर बनवण्यात आले त्यावेळी दक्षिणा देण्यासाठी सुद्धा मी २ लाख उधार घेतले होते.

ममता कुलकर्णीचे सध्याच्या घडीला तीन फ्लॅटस् आहेत, परंतु त्यांचीही डागडुजी न केल्याने वाईट अवस्था आहे. सध्याच्या घडीला मी भयानक आर्थिक संकटातून जात आहे असंही ममताने माध्यमांना म्हटले आहे.

माध्यमांनी ममताला तिने वेदांचा अभ्यास केला आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर ममता म्हणाली की, महामंडलेश्वर ही पदवी ज्यांना वेदांचे चांगले ज्ञान आहे त्यांनाच दिली जाते. त्यानंतर तिने माध्यमांसमोर ऋग्वेदातील एक मंत्र देखील वाचला.

ममता कुलकर्णीची प्रयागराज येथील महाकुंभातील किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर म्हणून आध्यात्मिक गुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ममता अनेक वादांमध्ये अडकली होती. महामंडलेश्वर होण्यासाठी ममताने त्रिवेणी संगम घाटावर ‘पिंडदान’ देखील केले आणि तिचे नाव यमाई ममता नंदगिरी असे ठेवले. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर, किन्नर आखाड्याचे प्रमुख ऋषी अजय दास यांनी तिला नंतर काढून टाकले होते. यावर त्यांनी असा दावा केला की, ममता कुलकर्णीची नियुक्ती त्यांच्या नकळत आणि कोणत्याही धार्मिक किंवा आखाड्याच्या परंपरेचे पालन न करता करण्यात आली होती.