महाविकास आघाडीला 160 जागा मिळणार असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच सरकार स्थापन करण्यापासून आम्हाल कोणीही रोखू शकत नाही असेही संजय राऊत म्हणाले.
आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे सर्वे पेड असतात, त्यावर आमचा विश्वास नाही, हरयाणात काय झालं. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला पाच जागा मिळणार नाहीत असं एक्झिट पोलमध्ये म्हटलं होतं. तिथे सपाला 40 जागा मिळाल्या. एक्झिट पोलमध्ये भाजपला 400 जागा दाखवल्या, त्यांना बहुमतसुद्धा मिळालं नाही. लोकसभेत राज्यात महाविकास आघाडीला 10 जागाही मिळणार नहाीत असं म्हटलं होतं. 31 जागा जिंकलो. सर्वेची ऐशी ची तैशी, महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकू. आम्ही 26 तारखेला सरकार स्थापन करू असे संजय राऊत म्हणाले.
शिंदे फडणवीसांकडून अपक्षांना 50 कोटी रुपयांची ऑफर
सरकार अधिक मजबूत करायचे असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष आणि लहान पक्ष येतात. काही अपक्षांनी आम्हाला आताच पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अपक्षांना 50-50 कोटी रुपयांची ऑफर द्यायला सुरूवात केली आहे. याचा अर्थ आम्ही जिंकत आहोत. यांना जिंकण्याची एवढी खात्री असती तर त्यांनी पैश्यांच्या थैल्या त्यांनी आतापासूनच दिल्या नसत्या.
महायुतीने लाडक्या बहीणीची मतं विकत घेतली का?
महायुतीच्या नेत्यांनी म्हटलंय लाडक्या बहिणींनी त्यांना मत दिलंय. महायुतीने लाडक्या बहीणीची मतं विकत घेतली का? लाडक्या बहीणी फक्त तुमच्याच आहेत का? हे सगळं उद्या कळेल. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. गुन्हे करून सुटण्याचे जे स्वातंत्र्य गौतम अदानीला आहे ते स्वातंत्र्य सगळ्यांना आहे.
प्रकाश आंबेडकर लोकशाही मानणारे नेते आहेत. जर त्यांना 40-50 जागा मिळणार असतील तर आणि सत्तेसाठी 40-50 आमदार कमी पडत असतील तर नक्की आम्ही त्यांचा विचार करू. लोकसभा निवडणुकीत त्यांनी आमच्यासोबत यावं म्हणून आम्ही प्रयत्न केला. विधानसभेतही प्रयत्न केला.
आम्हाला कोणीही रोखू शकत नाही
राजभवनात भाजपची शाखा आहे, केंद्रीय गृहमंत्रालयात भाजपचा कारभार असल्याने ते सरकार स्थापनेत अडथळा आणू शकतात. आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी ते प्रयत्न करतील, आम्ही सर्व अडथळे आले तरी राज्यात आम्ही सरकार स्थापन करू. सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही.
आमचे निवडून आलेले आमदार त्यांना मुंबईत ठेवणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांना मुंबईत निवासस्थान नाही. त्यामुळे सर्व आमदारांची एकत्र निवासव्यवस्था करावी असा आमचा निर्णय झाला.
मी कुणालाही बंडखोर मानत नाही, सर्वांना निवडणूक लढवण्याचा निर्णय आहे. काही अपक्ष लढतात काही छोट्या पक्षाच्या आधारे निवडणूक लढवतात, जे लोक मजबूत स्थितीत आहेत त्या सर्वांसोबत आमचा संवाद सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही. सर्व मिळून मुख्यमंत्रिपदचा नेता निवडतील.
उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचा अनुभव नव्हता, त्यांच्यासारखे उत्तम सरकार कुणीच चालवलं नाही महाराष्ट्रात. म्हणून तर मी म्हणतोय की त्यांच्या नेतृत्वात आम्ही सरकार स्थापन करायचे प्रयत्न करू आम्ही.
दक्षिण सोलापूरची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सुटली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी त्यांचे काम करायला पाहिजे होतं. ठिकठिकाणी असे प्रकार झाले की जो उमेदवार होता त्याच्यामागे शिवेसना आणि राष्ट्रवादी ठामपणे उभी होती. काही अपवाद होते, त्यावर उद्या निकाल लागल्यावर आम्ही एकत्र चर्चा करू.
उद्या निकाल आहे, उद्या 10 वाजल्यानंतर मी सांगेन मुख्यमंत्री कोण होईल. राज्यात महिलां मतदाराचे प्रमाण वाढले हे याचे आम्ही स्वागत करतो आणि त्याचे कौतुक आहे. हा योगींचा महाराष्ट्र नाही की जिथे पोलीस महिलांवर बंदूक रोखतील. हा महाराष्ट्र आहे आणि इथे महिलांना मत देण्याचा पूर्ण अधिकार आहे.
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे मुंबईतच आहेत. या सगळ्यात कोणताही वेळ न घालवता आम्ही निर्णय घेऊ, नाहीतर भाजपचे नेते आमच्या हातातला ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतके क्रूर आणि निर्घृण लोक आहे. ते घाईघाईत गौतम अदाणीला मुख्यमंत्री करतील असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.