वार्तापत्र- मुलुंड- मुलुंडच्या विकासाला आघाडीच देणार हात

दीपक पवार, मुंबई

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधील महत्त्वाचा मानला जाणारा मुलुंड विधानसभा मतदारसंघ सध्या अनेक समस्या आणि असुविधांचे माहेरघर बनले आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहतुककोंडी, पाण्याचा प्रश्न आहेच. याशिवाय  डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे गेली 28 वर्षे बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात नेमका कोणता विकास झाला असा प्रश्न आता येथील जनता करत असून यावेळी मुलुंडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला संधी असून मुलुंडच्या विकासाला महाविकास आघाडीच हात देईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

यावेळी भाजपकडून मिहीर कोटेचा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून राकेश शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रदीप शिरसाट निवडणुकीसाठी उभे आहेत.

मुलुंडमधील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर प्रचंड वाहतुककोंडीचा सामना करावा लागतो. 150 मीटरपर्यंतचा परिसर फेरीवाल्यांनी काबीज केलेला आहे. पदपथांवरही फेरीवालेच दिसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्कील होऊन जाते.

पार्किंगची सुविधा नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केलेली असतात. मुलुंडमध्ये असलेले खाशाबा दादासाहेब उद्यानाची दुरवस्था आहे. उद्यानात गर्दुल्ल्यांचा वावर असतो. निवडणूक जवळ आली की निविदा काढतात आणि ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले जातात. नाले खोदले जातात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी आणि वाहतूककेंडी असेच चित्र दिसते.

रेल्वे पादचारी पूल गेल्या दीड वर्षापासून रखडलेला आहे. एरोली जंक्शनपासून भांडूप लिंक रोड आणि मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था आहे. भाजी मार्केटचा विकास झालेला नाही. त्यामुळे फेरीवाले कुठेही बस्तान मांडतात. म्हाडा कॉलनी, पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या बस डेपोची अत्यंत दुरवस्था आहे.   

महाविकास आघाडीचे मतदारसंघातील व्हीजन

  • विशेषतः मुलुंड स्टेशन परिसरातील समस्या सोडवणार, स्टेशन परिसरात विविध सुविधा देणार
  • दीड वर्षापासून रखडलेल्या पादचारी पुलाचे काम मार्गी लावणार. रखडलेल्या पायाभूत सुविधांचे काम पूर्ण करणार. वाहतुकीचा प्रश्न सोडवणार. मेट्रोचे रखडलेले काम मार्गी लावणार
  • फेरीवाल्यांना सुविधा उपलब्ध करून देणार, जेणेकरून स्टेशन परिसरात फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना अडचण येणार नाही.
  • मुलुंडमधील लोकसंख्या पाहता आणि रोज कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता बेस्टच्या बस सेवा, रिक्षा सेवा प्रवाशांना नियमित कशा उपलब्ध होतील यादृष्टीने काम करणार.
  • आर मॉलजवळ उभ्या राहाणाऱ्या नव्या मेट्रो स्टेशनजवळ बस सुविधा उपलब्ध करून देणार.
  • विनायक दामोदर सावरकर रुग्णालयाचे रखडलेले काम मार्गी लावणार आणि मुलुंडकरांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार.