‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडू लागल्याचे निमित्त साधून महायुती सरकारने महाविकास आघाडी सरकार आणि मिंधे सरकारच्या काळातील योजना गुंडाळण्याचा डाव साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी आणि मिंधे सरकारचा आनंदाचा शिधा बंद केला जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने तसा प्रस्ताव बनवला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
ही योजना बंद झाली तर सरकारला महिलावर्गाची नाराजी आणि विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे अन्य योजनांना कात्री लावण्याचा पर्याय अवलंबण्यावर सरकारचा भर आहे. बरोबरच या निमित्ताने महाविकास आघाडी आणि मिंधे गटाला शह देण्याची संधी साधण्याचे महायुतीमधील भारतीय जनता पक्षाचे षड्यंत्र आहे. अर्थमंत्री अजित पवार यांना हाताशी धरून महायुती सरकार महाविकास आघाडी सरकारने गरीबांसाठी सुरू केलेली शिवभोजन थाळी आणि मिंधे सरकारच्या काळापासून गरीब कुटुंबांना देण्यात येणारा आनंदाचा शिधा बंद करण्याच्या तयारीत आहे. चालू आर्थिक वर्षात या दोन योजनांवर 1300 कोटी रुपये खर्च केला गेला. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील महिन्यात होणार आहे. त्यामुळे अधिवेशनानंतर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
शिवभोजन बंद करू नका… भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शिवभोजन थाळी योजना बंद न करण्याची विनंती केली आहे. गरीबांना परवडेल अशा दरात ही थाळी उपलब्ध करून दिली जाते. या योजनेवर राज्य शासन वर्षाला 267 कोटी रुपये खर्च करते. त्याचप्रमाणे आनंदाचा शिधा या योजनेत केशरी रेशनकार्डधारकांना सणासुदीच्या काळात 100 रुपयांत चार वस्तू दिल्यामुळे गोरगरीबांना दिलासा मिळतो, असे ते म्हणाले.