>> शिल्पा सुर्वे
20 वर्षांची अनाम शेख क्लासला गेली होती. घरी परतताना तिने वडिलांना मुजफ्फर शेख यांना स्टेशनवर न्यायला बोलावले. दोघे बाईकवरून घरी जायला निघाले. तसे मुजफ्फर शेख अनेकदा लेकीला आणायला स्टेशनवर जातात. कुणाला माहीत होतं की ती रात्र त्यांच्या आयुष्यातील अखेरची सफर ठरेल. भरधाव वेगाने आलेल्या बसने त्यांच्या बाईकला जोरदार धडक देत फरफटत नेले. मागच्या बाजूला बसलेली अनाम बसच्या चाकाखाली आली. तिचा जागीच मृत्यू झाला. मुजफ्फर शेख दुसऱयाबाजूला कोसळले. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर हबीब रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लेकीचा मृत्यू झाल्याचे त्यांना माहीत नाही. शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मुजफ्फर शेख फिल्म इंडस्ट्रीत मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यांना मुलगा फहाम आणि मुलगी अनाम अशी दोन अपत्ये. सोमवारी रात्री अनामला आणायला ते स्टेशनवर गेले होते. अनाम पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. तिने बेकिंगचा क्लास लावला होता. क्लासवरून परतल्यावर कुर्ला स्टेशनला उतरून वडिलांसोबत बाईकवर बसून ती घरी यायला निघाली होती, मात्र ती घरी परतलीच नाही. घटनास्थळी त्यांची बाईक नातेवाईकांना सापडली. मुजफ्फर यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे तरुण मुलीचा मृत्यू आणि दुसरीकडे पती अत्यवस्थ. त्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. मंगळवारी सायंकाळी अनामच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले.