वक्फ सुधारणा विधेयकावरून मुस्लिम समाज आक्रमक, विधेयकाविरुद्ध रझा अकादमी रस्त्यावर उतरणार, सुप्रीम कोर्टात जाण्याचाही इशारा

मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारी रझा अकादमी वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. याप्रकरणी प्रसंगी रस्त्यावर उतरू आणि सर्वोच्च न्यायालयातही जाऊ, असा इशारा अकादमीने दिला आहे. या विधेयकामुळे देशातील 99 टक्के मुस्लिम नाराज झाले आहेत, असा दावाही करण्यात आला आहे.

रझा अकादमीने मुंबईत याप्रश्नी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात मुल्ला-मौलवींबरोबरच मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे मुसलमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असल्याचे सांगत यावेळी निषेध नोंदवण्यात आला. हा धार्मिक प्रश्न असून त्यासाठी कोणतीही कुर्बानी देण्यास आम्ही तयार आहोत, असे मौलवी खलिदी रहमान नूर यांनी सांगितले.

मोदी-शहा खोटारडे

मुस्लिमांच्या हितासाठी वक्फ विधेयक आणल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सांगत आहेत. मोदी-शहा खोटारडे आहेत. भाजप मुस्लिमांसाठी नाही तर मोदी-शहांच्या मित्रांसाठी काम करतेय, असा आरोपही नूर यांनी केला. आता वक्फच्या जमिनी हडप केल्या जातील असे सांगत हे विधेयक मुस्लिम समाजाला मान्य नाही, असे ते म्हणाले.