ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला, त्यानंच घात केला; संगीतकार प्रितमच्या स्टुडिओतून 40 लाखांची रोकड चोरी

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चोराने त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. ही घटना घडून काही दिवस उलटत नाही तोच बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार प्रितम चक्रवर्ती यांच्या मुंबईतील स्टुडिओमध्ये चोरीचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. स्टुडिओतील एका कर्मचाऱ्यानेच 40 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची तक्रार प्रितम यांच्या मॅनेजरने मालाड पोलीस स्थानकात दिली आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, चोरीची ही घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली. स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हातचलाखी करत 40 लाख रुपयांची रोकड लंपास केली. आशिष सयाल (वय – 32) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात प्रितमचा मॅनेजर विनीत चेड्डा याने मालाड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तैनात केले आहे.

नक्की काय घडलं?

4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. प्रितम यांच्या संगीत स्टुडिओमध्ये यूनिमस रिकॉर्ड प्रायव्हेट लिमेटेडचा एक कर्मचारी 40 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन आला होता. ही बॅग त्याने प्रितमचा मॅनजर विनीत चेड्डा याच्याकडे सोपवली. यावेळी आशिष सयाल, अहमद खान आणि कमल दिशा हे देखील तिथे उपस्थित होते. यानंतर मॅनेजर त्याच इमारतीत असलेल्या प्रितमच्या घरी गेला. तत्पूर्वी स्टुडिओतून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी रोख रक्कम ट्रॉली बॅगमध्ये ठेवली. मात्र प्रितम यांच्या घरून परत आल्यावर मॅनेजरला रोख रक्कम असलेली ट्रॉली बॅग गायब झाल्याचे लक्षात आले.

विनीत चेड्डा यांनी स्टुडिओतील कर्मचाऱ्यांकडे बॅगबाबत विचारणा केली असता ती बॅग आशिष सयाल प्रितम चक्रवर्ती यांच्या घरी घेऊन गेल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मॅनेजरने आशिषयी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही आणि नंतर फोन स्विच ऑफ केला. संशय आल्याने मॅनेजरने तात्काळ प्रितम यांना सर्व प्रकार सांगितला. प्रितम यांच्या सांगण्यावरून मॅनेजरने पोलिसात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीच्या नातेवाईकांशीही संपर्क साधला असून त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून शोध घेण्यासाठी पथक नियुक्त केले आहे.