
शासकीय भात खरेदी केंद्राच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. आताही असाच एक नवीन घोटाळा समोर आला आहे. मुरबाडमध्ये 56 लाखांचा धान्य खरेदी घोटाळा झाला असून धसई केंद्र प्रमुखावर गुन्हा दाखल होऊन पाच महिने उलटले तरी तपास पुढे सरकलेला नाही. तपासाच्या फायलीवर धूळ साचली असून गोरगरीब आदिवासी शेतकरी मात्र या सर्वात भरडला जात आहे.
दुधनोली आदिवासी संस्थेच्या धसई केंद्रावर खरीप हंगाम 2022-23 मधील धान्य खरेदीत 1 हजार 200 किलो किंवटलचा घपला झाल्याचे चौकशीत उघड झाले होते. सोबत बारदानातदेखील घपला मारण्यात आला होता. भात खरेदी करतानादेखील एका क्विंटलमागे २ किलो भात वाढीव घेत शेतकऱ्यांची लूट केली असल्याने या घपल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी दुधनोली सेवा संस्थेचे संचालक अनिल भांगले यांनी केली होती. धसई खरेदी केंद्रावर 2136 क्विंटल भाताचा 56 लाखांचा घपला झाला आहे. अच्यूत वाळकोळीवर गुन्हा दाखल होऊन पाच महिने उलटले तरी तपास पुढे सरकलेला नाही. पोलीस आणि शासकीय अधिकारी आरोपींना का वाचवत आहेत, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांचा आहे.
चेअरमन मोकाट कसा?
भात खरेदी करण्याअगोदर ऑनलाइन प्रक्रिया करताना शासन अॅप खरेदी केंद्रांना दिले जाते. त्या अॅपवर आयडी म्हणून खरेदी केंद्रप्रमुखाला दिली जाते. परंतु ती आयडी केंद्रप्रमुखाची नसून चेअरमन चिंतामण वाळकोळी यांची होती. त्यामुळे भात खरेदीत झालेला घपला यात केंद्रप्रमुख अच्यूत वाळकोळी सोबत चिंतामण वाळकोळी यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.