मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात पावसाळय़ानंतर तब्बल 650 मेट्रिक टनांची घट झाली आहे. पावसाळय़ापर्यंत मुंबईत दररोज 6850 मेट्रिक टन कचरा जमा होत होता, मात्र आता दररोजच्या कचऱ्याचे प्रमाण 6200 मेट्रिक टनांवर आला आहे. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सोसायट्यांमध्ये सक्ती आणि जनजागृती यामुळे हे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, पालिका लवकरच कचऱ्यावर कर लावणार असून त्याचा मालमत्ता करात समावेश केला जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायट्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापनकरणे बंधनकारक करण्यात आले होते. यानुसार मुंबईतील सुमारे साडेचार हजार सोसायट्यांमधील बहुतांशी सोसायट्यांनी आवारातच ओल्या-सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली होती. मात्र मुंबईत मार्च 2020 पासून कोरोना सुरू झाल्यानंतर बहुतांशी सोसायट्यांमध्ये होणारे कचरा व्यवस्थापन, कचऱ्याची विल्हेवाट प्रक्रिया बंद झाल्यामुळे पालिकेचे काम वाढले होते. त्यामुळे पालिकेने 20 हजार चौरस मीटरवरील आणि दररोज 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांची पुन्हा तपासणी करून कचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले. त्यामुळेच आता कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे.
असे होतेय काम
सोसायट्यांना ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवावा लागणार आहे. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी आवश्यक मदत पालिका सोसायट्यांना करीत आहे, तर सुक्या कचऱ्याची विल्हेवाट पालिकेकडून लावली जात आहे. काही भूमिगत कचऱ्या पेट्यांमध्येही कचरा जमा केला जातो.
मुंबईत सद्यस्थितीत दररोज 6 हजार मेट्रिक टनांवर कचरा जमा होतो. हा कचरा घनकचरा विभागाकडून जमा करून डंपिंग ग्राऊंडवर नेला जातो. यामध्ये सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट आणि पुनर्वापराची प्रक्रियाही करण्यात येते.
मात्र घनकचरा विभागाला कचरा विल्हेवाटीतून काहीच उत्पन्न मिळत नाही. मुंबईजवळ असलेल्या ठाणे, विरार पालिकांमध्ये मात्र कचरा उचलण्याचे शुल्क घेतले जाते. लवकरच मालमत्ता कराच्या ‘युजर टॅक्स’मध्ये हे शुल्क समाविष्ट केले जाईल. यामुळे पालिकेला वर्षाला किमान दहा कोटी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.