शहरातील बेकायदा फलक आणि होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर महापालिकेकडून वारंवार कारवाई केली जाते. पालिकेच्या कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेकायदा जाहिरातफलक आणि होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. मात्र, पोलिसांकडून गुन्हे दाखल करून घेण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे बेकायदा जाहिरातफलक आणि होर्डिंग्ज लावणाऱ्यांना पोलीस प्रशासनाचे अभय आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत सर्वच विभागांची टीम एकाच वेळी रस्त्यावर उतरून स्वच्छता, अतिक्रमण हटविणे, तसेच बेकायदा जाहिरातफलक, होर्डिंग्ज व त्यासाठी उभारण्यात आलेले सांगाडे काढण्याचे काम करीत आहे. काही भागांत ही कारवाई झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी खांबांवर आणि चौकांमध्ये पुन्हा जाहिरातफलक लावले जात असून, विद्रूपीकरण केले जात आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. बेकायदा जाहिरातफलक लावल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 2017मध्ये बेकायदा जाहिरातफलकांसंदर्भातील खटल्यामध्ये बेकायदा फलक लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच पोलिसांनादेखील प्रतिवादी करण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने मागील काही महिन्यांमध्ये बेकायदा जाहिरातफलक लावल्याबद्दल संबंधितांवर विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले आहे. गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी पोलिसांना 110 पत्रे पाठविली आहेत. मात्र, अद्यापि त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन पोलीस आयुक्तांकडे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.