भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अभिवादन म्हणून त्यांच्या योगदानावर आधारित भित्तिशिल्प मुंबई महापालिकेच्या डी विभागाने पेडर रोडजवळच्या केम्प्स कॉर्नर उड्डाणपुलालगत मार्च 2024 साली साकारले आहे. या भित्तिशिल्पाच्या अनावरणावेळी मंगेशकर कुटुंबीयांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुमारे 50 फूट लांब व 15 फूट उंच आकाराच्या भित्तिशिल्पावर लतादीदींचा संगीतमय जीवनपट कलात्मक व सुंदररीत्या मांडण्यात आला आहे. लतादीदींच्या संगीत क्षेत्रातील प्रवासाचे विविध टप्पेही यात दर्शवण्यात आले आहेत. मात्र, एक वर्षही पूर्ण न झालेल्या भित्तीशिल्पाकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केले असून लतादीदींच्या शिल्पावर धूळ जमा झाली आहे, अशी फोटो स्टोरी दैनिक ‘सामना’ने देताच महापालिकेला जाग आली असून शुक्रवारी तातडीने पाण्याचा मारा करून शिल्पाची स्वच्छता करण्यात आली.