
बोरिवली येथील भगवती रुग्णालयासह वांद्रे भाभा रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरीवली, एम.टी. अग्रवाल रुग्णालय मुलुंड (प.) आणि महात्मा फुले रुग्णालयांमुळे गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांना मोठा फायदा होत आहे. त्यामुळे जनतेच्या पैशातून बांधलेल्या रुग्णालयांचे खासगीकरण केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनच्या वतीने पालिकेला देण्यात आला आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत असल्यामुळे पालिकेची रुग्णालये केवळ मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरली आहेत. अशा रुग्णालयांचे खासगीकरण केल्यास खासगी मालकांची मनमानी वाढून गोरगरीबांना फटका बसणार आहे. शिवाय या रुग्णालयांमधील पालिका कामगारांवर बेकारीची कुऱहाड कोसळणार आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयांचे खासगीकरणाचा प्रयत्न केल्यास जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला आहे. याबाबत युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन दिले आहे.