लाच घेताना पालिकेचा अधिकारी ट्रॅप, लिपिकाला अटक

अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांत पालिकेचे अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. पालिकेच्या के पूर्व वॉर्डातील पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी यांना 75 लाख रुपये घेताना तर पालिकेच्या एन वॉर्डातील लिपिक उद्धव गर्जे हे पाच हजार रुपये घेताना ट्रप झाले.

शमील (नाव बदललेले) यांची चार मजली इमारत असून त्यापैकी वरील दोन मजले अनधिकृत आहेत. त्या दोन मजल्यांवर निष्कासन कारवाई न करण्याकरिता तसेच नियोजित प्लॉट खरेदी केल्यानंतर तेथील अनधिकृत बांधकामाबाबत सहकार्य करण्यासाठी पालिकेच्या के पूर्व वॉर्डातील पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी यांनी शमील यांच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. शमील यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. त्यानुसार अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने केलेल्या पडताळणी कारवाईत मंदार तारी यांनी दोन कोटी रुपयांची मागणी करून पहिला हफ्ता 75 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे समोर आले. त्यानंतर केलेल्या सापळा कारवाईत तारी यांच्या सांगण्यावरून शमील यांच्याकडून 75 लाख रुपयांची रोकड स्वीकारताना मोहमद शहेजादा शहा (33) आणि प्रतीक पिसे (35) या दोघा खासगी व्यक्तींना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी मंदार तारी यांच्यासह शहा व पिसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, जगन्नाथ (नाव बदललेले) हे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत आहेत. नियत वयोमानानुसार वर्ष 2022 मध्ये त्यांना पदोन्नती देय होती. त्यासाठी जगन्नाथ यांनी घाटकोपर स्थित एन वॉर्डात संबंधित कार्यालयात अर्ज केला होता. तेव्हा तुम्हाला आधी पदोन्नती देतो मग ऑगस्ट महिन्याचा पगार झाल्यानंतर मला पाच हजार रुपये द्या, अशी मागणी एन वॉर्डातील लिपिक उद्धव गर्जे यांनी केली होती. मात्र जगन्नाथ यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केल्याने गर्जेला पाच हजारांची लाच घेताना पकडले.