
अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी वडवली गावात गेलेल्या महापालिका पथकावर मिंधे गटाचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मारहाण केली होती. याबद्दल सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा तीव्र निषेध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केला आहे. दुर्योधन पाटील याला बेड्या ठोका, अशी मागणी कर्मचारी संघटनेने पालिका आणि पोलिसांकडे केली आहे.
अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने वडवली गावात पाहणीसाठी दौरा केला होता. यावेळी पथकप्रमुख राजेंद्र साळुखे, शिरीष गर्गे, आशिष टाक, विलास साळवी व रमेश भाकरे यांना दुर्योधन पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव याने शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी दुर्योधन पाटील, वैभव पाटील यांच्यासह गुंडांना अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे म्युनिसिपल कर्मचारी कामगार युनियन आक्रमक झाली आहे. हा कर्मचाऱ्यांवरचा हल्ला नसून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच आघात आहे. याआधीही अशा घटना घडल्या असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी युनियनचे अध्यक्ष बाळ हरदास, सरचिटणीस सचिन बासरे, अजय पवार, सुरेश तेलवणे, तात्या माने, सुनील पवार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.