धार्मिक स्थळांसाठी पालिकेची विशेष स्वच्छता मोहीम; घनकचरा विभाग, स्वयंसेवी संस्था, सर्वसामान्य होणार सहभागी

सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत आता मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. 28 एप्रिलपासून ही मोहीम सुरू होणार असून ती 9 मे पर्यंत दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 वेळेत राबवली जाणार आहे. स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा-यांच्या सामूहिक प्रयत्नांतून ही मोहीम राबवली जाणार आहे.

मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या संपूर्ण सखोल स्वच्छता अभियाना अंतर्गत मुंबईतील लहान-सहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालये, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, मैदाने, शाळा इत्यादींच्या स्वच्छतेसाठी पालिकेने विशेष मोहीम राबवली. यानंतर आता मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. दरम्यान, विभागीय कार्यालयांनी (वॉर्ड) सक्रियपणे सहभाग नोंदवण्याच्या सूचनाही उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिल्या आहेत.

व्यापक स्वच्छतेवर भर देणार

मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवताना संबंधित धार्मिकस्थळांचे विश्वस्त आणि अन्य प्रतिनिधींशी समन्वय साधला जाणार आहे. प्रामुख्याने धार्मिक स्थळाभोवतालचा परिसर, वाहनतळ, घनकचरा संकलनाचे ठिकाण, पदपथ इत्यादींची यांत्रिक तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या साहाय्याने व्यापक स्वच्छता करण्यात येणार आहे. यावेळी कच-याचे संकलन आणि पाण्याने संपूर्ण परिसर धुऊन काढला जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.