मुंबई महापालिकेच्या 2024-2025 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असून वर्षअखेरीपर्यंत हा कर भरा नाहीतर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ताधारकांना दिला आहे.
मुंबईतील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करता यावा यासाठी पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांच्या सुविधेसाठी शनिवारीदेखील प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आले आहेत तसेच या संबंधित अडचणींचा निपटारा करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी अविरत कार्यरत आहेत. दरम्यान, अजूनही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिलपासून ते 26 डिसेंबरपर्यंत एकूण कर संकलन 5 हजार 243 कोटी 16 लाख रुपये इतके करण्यात आले आहे. महापालिकेने या आर्थिक वर्षात 6 हजार 200 कोटी रुपयांचे कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मागील आर्थिक वर्ष (2023-24) मधील मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ही 25 मे 2024 पर्यंत होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षातील सुमारे 1 हजार 660 कोटी रुपये रक्कमदेखील यात समाविष्ट आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षाचे (2024-25) कर संकलन हे 3 हजार 582 कोटी 67 लाख रुपये (58 टक्के) इतके झाले आहे.
मध्यरात्रीपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार
मालमत्ता कर भरण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील 24 वॉर्डमधील नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवली आहेत. 30 डिसेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत तर 31 डिसेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ही सुविधा केंद्रे सुरू ठेवली जाणार आहेत. महापालिकेच्या मुख्यालयातही मालमत्ता कर भरता येणार आहे.