रस्ते-ब्रीजवर कोणत्याही प्रकारच्या होर्डिंगला बंदी, फुटपाथवरही फलक लावता येणार नाही; महापालिका कठोर नियमावली आणणार

होर्डिंग कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमुळे होणारी जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी पालिका लवकरच कठोर नियमावली आणणार असून रस्ते-ब्रीज आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे होर्डिंग लावण्यास बंदी घातली जाणार आहे. व्हिडीओ पिंवा लक्षवेधन चित्रे, चलचित्रे यांच्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचे प्रकार घडतात. त्यामुळे हा निर्णय घेणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

घाटकोपर छेडानगर येथे 13 मे रोजी झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा बळी गेला. शिवाय 50हून अधिक जण जखमी झाले. यामुळे मुंबईतील धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने 40 फूट बाय 40 फूट याच आकाराचे होर्डिंग असावे, यापेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग नसावे, असे सक्त निर्देश मुंबईतील सर्व प्राधिकरणांना दिले आहेत. या शिवाय आता रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि अपघातांना आमंत्रण देणारे होर्डिंग कायमस्वरूपी हटवण्यासाठी  कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी तयार होणाऱ्या धोरणात कठोर नियमावली तयार केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विद्रुपीकरण, अपघात, पर्यावरणाला धोका

मुंबईतील छोटय़ा रस्त्यांसह पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्ग, इस्टर्न एक्सप्रेसवेसह सर्वच ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणात होर्डिंग लावले जातात. अनेक वेळा हे होर्डिंग लटकलेल्या स्वरूपात असल्याने वाहनांचे अपघात होतात. शिवाय परिसराचे विद्रुपीकरण होते. विशेष म्हणजे होर्डिंगसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिकचे विघटन होण्यात मोठा कालावधी लागत असल्याने या छोटय़ा होर्डिंगचा पर्यावरणालाही फटका बसतो.

ब्रीज, गाड्यांवरील चलचित्रांनाही बंदी

मुंबईतील मोठय़ा रस्त्यांवर असणारे छोटे ब्रीज आणि रस्त्यावरील मोठय़ा ब्रीजवर मोठमोठे होर्डिंग लावले जातात. यामुळेही अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे अशी होर्डिंग लावण्यासही बंदी घातली जाणार आहे. शिवाय खासगी कंपन्यांच्या टॅक्सींवरही चलचित्रे असलेल्या जाहिरातीवरही बंदी घातली जाईल.