विधानसभा निवडणूक कामासाठी महापालिकेचे तब्बल पाच हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. अधिकारी व कर्मचारी ‘इलेक्शन ड्युटी’त व्यस्त असल्याने महापालिका व क्षेत्रीय कार्यालये ओस पडली असून, दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे कामाचा खोळंबा होत असल्याने नागरिकांककडून नाराजी व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी पुणे विभागीय कार्यालयाने निवडणूक कामासाठी महापालिकेच्या संभाव्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार केल्या होत्या. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तत्काळ संबंधितांना कामकाजाच्या ठिकाणी नेमणूक देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत सहायक निवडणूक अधिकारी, झोनल ऑफिसर व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात काही अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. मतदान केंद्रावर लागणाऱ्या साहित्याची तयारी सुरू आहे. ईव्हीएम, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशीनची ने-आण, देखभाल, तसेच विविध पथके, तसेच कामकाजासाठी कर्मचारी नेमले आहेत. मतदानयंत्राच्या तपासणी व प्रशिक्षणाचे कामकाज सुरू आहे.
आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रभावित करणाऱ्या अनेक योजना थांबविण्यात आल्या आहेत. तसेच बहुतांशी अधिकारी व कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर असल्याने कामकाज ठप्प झाले आहे. इलेक्शन ड्युटीमुळे त्या कर्मचाऱ्यांना महापालिका कामकाजातून, तसेच थम्ब इप्रेशनमधून सूट देण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती नसल्याने महापालिका भवन व क्षेत्रीय कार्यालये ओस पडली आहेत.
पाच हजार कर्मचारी निवडणुकीसाठी
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणूक कामकाजासाठी महापालिकेच्या तब्बल पाच हजार 177 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांत वर्ग-2 व 3चे दोन हजार 352, वर्ग-4चे एक हजार 610 कर्मचारी, पीआरओ, एफपीओ, ओपीओ, बीएलओ, झेडओ, एमओ आदींसाठी एक हजार २१५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुकीचे काम नसलेलेही पालिकेबाहेर !
महापालिकेच्या संबंधित कामासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पदाधिकारी हे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करून संपर्क साधतात. आता त्यांना संपर्क केला असता, ‘इलेक्शन ड्युटीला आहे,’ असे उत्तर दिले जाते. काहीजण फोन एसएमएस करून इलेक्शन ड्युटी असल्याचे सांगून मोकळे होतात. तर, काहींना निवडणुकीचे काहीच काम नसतानाही ते महापालिका व क्षेत्रीय कार्यालयांत न थांबता, निवडणुकीचे कामकाज असल्याचे सांगून बाहेर फिरत आहेत.