
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर क्लीन-अप मार्शलकडून कारवाई केली जात आहे. मात्र वॉर्डनिहाय प्रत्येकी 30 क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्याचा नियम असताना काही ठिकाणी त्यापेक्षा कमी संख्येने मार्शल कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महापालिकेने क्लीन-अप मार्शलच्या सात कंत्राटदार संस्थांना 65 लाखांचा दंड केला आहे. दरम्यान, स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. स्वच्छतेसंदर्भात कारवाईसाठी नेमलेल्या क्लीन-अप मार्शलना अधिक सक्रिय करावे, असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
मुंबईत सार्वजनिक स्वच्छता राहावी यासाठी पालिकेने भर दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, थुंकणे, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभागनिहाय क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ‘स्वच्छ मुंबई अभियान’अंतर्गत मुंबईत स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या क्लीन-अप मार्शलच्या संस्थांचे प्रतिनिधी यांची आज पालिका मुख्यालयात बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त किरण दिघावकर यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मोकळय़ा जागेवर कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई
ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या, मोकळय़ा जागेवर कचरा जाळणारे, झाडांच्या पालापाचोळय़ाची योग्य विल्हेवाट न लावणारे, जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
अशी झाली कारवाई
कामकाजात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एफ दक्षिण विभागात कार्यरत संस्थेकडून 31 लाख 34 हजार रुपये, आर मध्य विभागातील संस्थेकडून 16 लाख 3 हजार रुपये, आर दक्षिण विभागातील संस्थेकडून 12 लाख 70 हजार अशा सात संस्थांकडून 65 लाखांवर दंड वसूल करण्यात आला आहे, तर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर मागील 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये 1 लाख 40 हजार 584 नागरिकांकडून 4 कोटी 54 लाख 51 हजार 412 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.