
महानगरपालिकेकडून बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात असून, ती सुरूच राहणार आहे. तसेच माणिक चौक परिसरात रस्त्यावर व्यवसाय थाटणाऱ्यांचे साहित्य जप्त करून दोन हजार रुपये दंड आकारण्यात आला, तर जप्त करण्यात आलेले साहित्य परत देण्यात येणार नाही, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
बाजारपेठेसह संपूर्ण शहरात महानगरपालिकेने अतिक्रमणांवर कारवाईचे नियोजन केले आहे. भिंगारवाला चौक ते तेलीखुंट चौक या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या २० पेक्षा जास्त विक्रेत्यांचे साहित्य, कपड्याचे गड्ढे, जाहिरात फलक, दुकानांसमोरील लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या. शहाजी रोडवरील सारडा गल्ली कॉर्नर ते पोखरणा ज्वेलर्सपर्यंत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या हातगाड्यांवर कारवाई सुरू होताच विक्रेते गाड्या घेऊन जिथे जागा मिळेल, तेथे पळाले. तसेच सारडा गल्ली ते मोहन ट्रंक डेपोपर्यंत रस्त्यावर १५ व्यावसायिक, दुकानदारांनी लोखंडी स्टुल, टेबल व जाळ्या टाकून अतिक्रमण केले होते. त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. मोची गल्ली, गंज बाजार व सराफ बाजारांमधील ५० पेक्षा जास्त हातगाडीधारक, पथविक्रेते यांचे साहित्य, टेबल, ताडपत्री, बांबू, जाहिरात फलक, गाड्या जप्त करण्यात आल्या. माणिक चौक परिसरातील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक, विक्रेत्यांच्या गाड्या जप्त करून दोन हजार रुपये दंड करण्यात आला.
दरम्यान, महापालिकेने सुरू केलेली मोहीम थांबणार नसून, सर्व भागात कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत मिळणार नाही, असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.