![bihar](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/bihar--696x447.jpg)
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुंगेर (Munger) जिल्ह्यात उद्घाटन केलेल्या मैदानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ( Nitish Kumar) यांनी या मैदानाचे उद्घाटन केले होते. आणि अवघ्या पाच दिवसांतच या मैदानातील सोलार लाईट्सची चोरी झाली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मुंगेर जिल्ह्यातील नौवागढ़ी मैदानात घडली आहे. मनरेगा योजनेअंतर्गत तब्बल 44 लाख रुपये खर्च करून हे मैदान बांधण्यात आले होते. याच बरोबर 3 लाख रुपये किमतीचे 8 सोलार लाईट्सचा या मैदानात वापर करण्यात आला होता. पण यापैकी फक्त चारच लाईट्स आता मैदानात शिल्लक असून उर्वरीत 4 लाईट्सची चोरी झाली आहे.
दरम्यान, या मैदानात काही मुले खेळण्यासाठी आणि काही मुले धावण्यासाठी मैदानात आले होते. यावेळी त्यांना मैदानात अंधार दिसला. तेव्हा त्यांनी लाईट्सची पहाणी केली असता, चार पोलवरून सोलार लाईट्स गायब होत्या. त्यावेळी मुलांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. मात्र त्यांना याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे मुलांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.