अत्याचारानंतर दहा वर्षाच्या चिमुरडीला सहाव्या मजल्यावरून फेकले, मुंब्यातील संतापजनक घटना

दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून नराधमाने तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकल्याची संतापजनक घटना मुंब्याच्या ठाकूरपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी नराधम आसिफ मन्सुरी (20) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून चिमुरडीचा जीव घेणाऱ्या आसिफला कठोरातील कठोर शिक्षा करा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

श्रद्धा प्राप्ती अपार्टमेंट परिसरात मित्रमैत्रिणींसोबत खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलीला नराधम आसिफ मन्सुरी याने खेळणी देण्याचे आमिष दाखवून घरी नेले. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहत असलेल्या आसिफने या चिमुकलीवर जबरदस्ती अत्याचार करून तिची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीमधून तिला खाली फेकून दिले. दरम्यान सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या डकमध्ये काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज आला. त्यांच्या घराची पाइपलाइनदेखील तुटली. रहिवाशांनी टॉर्च लावून पाहिले असता त्यांना चिमुकलीचा मृतदेह अर्ध निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला. यानंतर ही घटना उघडकीस आली.

क्रूरकर्माचा पर्दाफाश
दहा मजली इमारतीच्या व्हेंटिलेशन डकमध्ये चिमुरडीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दल जवानांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला होता. या शवविच्छेदन अहवालात नराधमाने लैंगिक अत्याचारानंतर तिच्या मानेत चाकू भोसकून हत्या केली आणि तिला खाली फेकून दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नराधम आसिफ मन्सुरीच्या क्रूरकर्माचा पर्दाफाश झाला.

अन् उलगडा झाला
चिमुकलीची आई कामावरून घरी परतल्यानंतर तिने तिचा शोध सुरू केला. त्यावेळी चिमुकलीसोबत खेळत असलेल्या मित्रमैत्रिणींनी समोरच्या इमारतीतील एका तरुणाने तिला खेळणी देण्यासाठी घरी घेऊन गेल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी आसिफच्या घराची झडती घेतली असता त्यांना चिमुरडीची कपडे व त्यावर रक्ताचे डाग आढळले. त्यानुसार पोलिसांनी नराधम आसिफ मन्सुरीच्या मुसक्या आवळत त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.