विठ्ठलनामाच्या जयघोषाने रविवार, 5 जानेवारी रोजी अवघी मुंबापुरी दुमदुमणार आहे. श्री वारकरी प्रबोधन महासमितीतर्फे दरवर्षी विठ्ठलनामाचा जयघोष करत श्री पांडुरंगाचा भव्य पालखी सोहळा आयोजित केला जातो. यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त समितीने यंदा संत संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे.
सोहळ्य़ाची सुरुवात रविवार, 5 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मुंबईतील हजारो वारकरी व दिंड्यांच्या सहभागाने कॉटन ग्रीन येथील श्रीराम मंदिर येथून पालखी प्रस्थानाने होईल आणि दुपारी 2 वाजता वडाळा विठ्ठल मंदिर येथे सांगता होईल. त्यानंतर फाइव्ह गार्डन येथे माऊलींच्या अश्वाचा नयनरम्य रिंगण सोहळा संपन्न होणार आहे. मुंबईत होणाऱ्या रौप्य महोत्सवी सोहळ्य़ास सर्व विठ्ठलभक्त मुंबईकरांनी वारीचा अनुभव घेण्यासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्राr आणि सचिव नाना निकम यांनी केले.
ह.भ.प. बन्सी महाराज उबाळे, माणिक महाराज मुखेकर शास्त्रा, रवींद्र महाराज हरणे यांचा गौरव
बहुमूल्य विठ्ठल सेवा कार्य करणाऱ्या तीन विभुतींचा महासमितीतर्फे दरवर्षी खास पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येतो. त्याचबरोबर ‘वारकरी सेवाधर्म पुरस्कार’ हा विशेष पुरस्कारसुद्धा या वर्षी प्रदान करण्यात येईल. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा महासमितीने केली आहे. बीड येथील ह.भ.प. बन्सी महाराज उबाळे यांना ‘वारकरी रत्न’, आळंदी येथील ह.भ.प. माणिक महाराज मुखेकर शास्त्राr यांना ‘वारकरी सेवाभूषण’ पुरस्कार (हैबती बाबा) आणि जळगाव मुक्ताईनगर येथील ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांना दै. ‘सामना’चा ‘समाजप्रबोधन’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कॉटन ग्रीनला रंगणार कीर्तन महोत्सव
रौप्य महोत्सवी सोहळ्य़ानिमित्त कॉटन ग्रीन येथील श्रीराम मंदिर परिसरात 29 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत रात्री 8 ते 10 या वेळेत कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. 29 डिसेंबर रोजी नेवासा येथील ह.भ.प. कृष्णा महाराज पुंड, 30 डिसेंबर ह.भ.प. चिदंबरेश्वर महाराज साखरे आळंदी देवाची, 31 डिसेंबर रोजी ह.भ.प. बाबा महाराज गजवडीकर सातारा, 1 जानेवारी रोजी ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर पंढरपूर, 2 जानेवारी रोजी ह.भ.प. नारायण महाराज यमगीर, आळंदी, 3 जानेवारी रोजी ह.भ.प. ज्ञानदेव महाराज रवळेकर, भोर, 4 जानेवारी रोजी संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्राr किल्ले, शिवनेरी आणि 5 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत ह.भ.प. मंगेश महाराज चक्कर यांचे कीर्तन होईल.