
कडक उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झाले असतानाच आता या कडक उन्हाने मुंबईकरांचा पाणीसाठाही अर्ध्यावर आणला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा अर्ध्यावर म्हणजे 7 लाख 47 हजार 436 दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. कडक उन्हामुळे तलावांतील पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि पाणीगळतीमुळे हा साठा आटला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, भातसा, तानसा, तुळशी आणि विहार या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत थंडी असते, मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यातच उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. उन्हाळय़ात पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात पाणीसाठा आणखी आटणार
सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांनाही उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे सध्याचा पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका असला तरी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन, गळती आणि पाणीचोरीमुळे पाण्याच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
23 फेब्रुवारीला जलसाठा
उपलब्ध (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा 1,63,299
मोडकसागर 25,316
तानसा 63,612
मध्य वैतरणा 98,803
भातसा 3,75,432
विहार 16,438
तुळशी 4,535