हिंदुस्थानी क्रिकेटचे टी-20 जेतेपद असलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडकासाठी मुंबई संघाचे नेतृत्व हिंदुस्थानी संघात पुनरागमन करण्यासाठी आसुसलेल्या श्रेयस अय्यरकडे सोपविण्यात आले आहे. तसेच आपल्या गैरवर्तनामुळे रणजी सामन्यातून वगळण्यात आलेल्या पृथ्वी शॉची 17 सदस्यीय मुंबई संघात निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या रणजी संघाचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणेसुद्धा या टी-20त फटकेबाजीसाठी उतरणार आहे. येत्या 23 नोव्हेंबरपासून ही 38 संघांची धमाकेदार स्पर्धा सुरू होणार असून 15 डिसेंबरपर्यंत रंगेल.
रणजी मोसमाचा पहिला टप्पा नुकताच संपला असून श्रेयसने गेल्या चार सामन्यांत 90.40 च्या सरासरीने 452 धावा केल्या आहेत. रणजीमध्ये जबरदस्त फॉर्मात असूनही त्याला कसोटी संघापासून दूर ठेवण्यात आले आहे. तरीही त्याने आता आपल्या फलंदाजीची करामत दाखवत मुंबईला टी-20चे जेतेपद जिंकून देण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेसाठी शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, सिद्धेश लाड, मोहित अवस्थी हे मुंबईचे रणजी स्टारही खेळणार आहेत.
मुंबईचा संघ ः श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अंगकृष रघुवंशी, जय बिस्ता, अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, साईराज पाटील, हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), आकाश आनंद (यष्टिरक्षक), शम्स मुलानी, हिमांशु सिंग, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, जुनेद खान.