16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणेदरम्यान हिंदुस्थानातील पहिली रेल्वे धावली आणि चमत्कार घडला. ‘बिनबैलाची गाडी कशी धावती रं…’ असे म्हणत अनेकांना आश्चर्यही वाटले, पण याच बिनबैलाच्या गाडीने सर्वसामान्यांच्या जीवनात मोठी क्रांती केली. त्यानंतर 3 फेब्रुवारी 1925 रोजी बोरीबंदर ते कुर्ला स्थानक या मार्गावर देशातील पहिली विजेवर रेल्वे चालवण्यात आली. या घटनेला आज तब्बल एक शतक पूर्ण झाले. ‘विजेवर चालणाऱ्या रेल्वेची अनोखी सेंच्युरी’ मध्य रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी एकत्रितपणे एन्जॉय केली. त्यानिमित्त रेल्वे स्थानकाच्या आवारात स्पेअर पार्टसचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याशिवाय फलाट क्रमांक 1 वर काढण्यात आलेली भव्य रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. यानिमित्ताने रेल्वेच्या इतिहासाला उजाळा मिळाला.
हाय टेन्शन रिले, लो टेन्शन रिले
विजेवर चालणाऱ्या डीसी ट्रेनचे सुटे भाग हे प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण ठरले. त्यात हाय टेन्शन रिले तसेच लो टेन्शन रिले हे दोन स्पेअर पार्टस लक्षणीय होते. या सर्व स्पेअर पार्टसची माहितीदेखील फलकावर लावण्यात आली होती. डीसी ट्रेनच्या काळातील अवजड स्प्रींग, सर्किट व अन्य मशीनदेखील प्रदर्शनात मांडल्या होत्या.
एसी ते डीसी
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलचा शतकी प्रवास हा अचंबित करणारा आहे. सध्या 25 हजार व्होल्टवर अल्टरनेट करंट आधारित लोकल चालतात. विजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या सेंच्युरीनिमित्ताने प्रशासनाने प्रवाशांशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे रेल्वेच्या ठाणे विभागाचे व्यवस्थापक केशव तावडे यांनी सांगितले.