महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात 540 जणांना ऑन द स्पॉट जॉब, दीड हजार बेरोजगारांनी लावली हजेरी

मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली पूर्व आकुर्ली येथील कौशल्य विकास प्रशिक्षा केंद्रात आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या 1490 उमेदवारांपैकी तब्बल 540 बेरोजगारांना ‘ऑन द स्पॉट जॉब’ मिळाला. या मेळाव्यात 28 व्यावसायिक कंपन्यांनी सहभाग घेत पात्र उमेदवारांना नोकरीची संधी दिली.

कौशल्य विकास केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण आणि नोकरीची संधी दिली जाते. तसेच या ठिकाणी अनेक नामांकित कंपन्यांनी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात टीम लीस, योमन, जीनीअस, पॉवर पॉईंट, ऑक्सिस, पॉलिसी बॉस्, आय करिअर, अदानी अशा 28 व्यावसायिक कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला.

रोजगारासाठी उमेदवारांना प्रशिक्षण

पालिकेच्या या कौशल्य विकास केंद्रात हॉटेल मॅनेजमेंट, विक्री आणि व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, एसी, फ्रीज दुरुस्ती प्रशिक्षण, व्हीएफक्स-ऑनिमेशन प्रशिक्षण, शिवणकामाचे व्यावसायिक प्रशिक्षण, पंचतारांकित हॉटेल्समधील नोकरीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आदी विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच नोकरीची संधी प्राप्त होते.