
पश्चिम रेल्वेच्या माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री घेतलेल्या जम्बो ब्लॉकचा रविवारी सकाळीही लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. गर्डर कामासाठी अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत मुंबईकरांचा खोळंबा झाला. विशेषतः संरक्षण खात्याच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेला चाललेल्या विद्यार्थ्यांना ब्लॉकचा फटका बसला. अनेक विद्यार्थी लोकल रद्द झाल्याने वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचले नाहीत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले.
पश्चिम रेल्वेने माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान असलेल्या पुलाच्या रिगर्डरिंगचे काम करण्यासाठी दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेतला होता. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत ब्लॉक घेऊन गर्डरचे काम करण्यात आले. त्याचा रविवारी सकाळी कामानिमित्त लवकर घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना फटका बसला.
बोरिवली, विरारवरून चर्चगेटच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अंधेरी स्थानकात रखडपट्टी झाली. सकाळी सात-आठ वाजण्याच्या सुमारास अनेक प्रवाशांचा अंधेरीत तासभर खोळंबा झाला. या प्रवाशांमध्ये संरक्षण खात्याच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेला (सीडीएस) चाललेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक होते. त्यांना साडेआठ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचायचे होते. मात्र लोकल प्रवासात अडकल्यामुळे निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.
रेल्वे प्रशासनाविरुद्ध विद्यार्थ्यांची नाराजी
सीडीएस ही केंद्र सरकारच्या पातळीवर घेतली जाणारी परीक्षा आहे. या परीक्षेच्या दिवशी ब्लॉक घेणे रेल्वे प्रशासनाने टाळले का नाही? रेल्वेच्या ब्लॉकमुळे आमच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असून आम्हाला पुढील परीक्षेसाठी सहा महिने थांबावे लागणार आहे. यात काहींची वयोमर्यादाही ओलांडली जाईल. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित करीत विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.
मध्य रेल्वेवरही प्रवाशांचे हाल
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान तसेच कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील संपूर्ण लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला. लोकल उशिराने धावत होत्या. त्यात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दिवसभर सर्वच रेल्वे स्थानकांत गर्दी झाली होती.