
थंडी आली की पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील अनेक मुंबईकर मॉर्निग वॉकसाठी बोरिवलीच्या नॅशनल पार्क व आरे कॉलनीत धाव घेतात. यंदा मुंबईत थंडीचा कडाका वाढण्याबरोबरच प्रदूषण घातक पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे नॅशनल पार्कमध्ये मॉर्निग वॉकर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. नागरिक शुद्ध हवेसाठी निसर्गाच्या सान्निध्यात जात आहेत. नॅशनल पार्कमध्ये मॉर्निग वॉकसाठी दररोज सहा ते सात हजार लोक हजेरी लावत आहेत.
मुंबई शहर व उपनगरांत मागील महिनाभरापासून प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढते बांधकाम प्रकल्प व प्रदूषणकारी उद्योगधंद्यांवर कडक नियमांचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे प्रदूषित हवेचा सामना करताना मुंबईकरांची घुसमट झाली आहे. अनेक गंभीर आजारांना निमंत्रण मिळण्याची भीती सतावत असल्याने मुंबईकरांनी आरोग्याकडे विशेष लक्ष दिले आहे. त्याच खबरदारीचा भाग म्हणून हरित क्षेत्र असलेल्या नॅशनल पार्क आणि आरे कॉलनीकडे मोठय़ा प्रमाणावर नागरिकांची पावले वळली आहेत. नॅशनल पार्कमध्ये ऑक्टोबरपर्यंत दररोज सरासरी दोन ते तीन हजार मॉर्निग वॉकर्स हजेरी लावायचे. हे प्रमाण अचानक दुप्पटीने वाढून सात हजारांच्या आसपास गेले आहे. त्यात दररोज वाढ होत असल्याचे नॅशनल पार्कमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या नागरिकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने आम्ही ‘मॉर्निंग वॉक’ला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने वार्षिक पासची व्यवस्था केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना पास दरात मोठी सवलत दिली आहे. याचा लाभ घेण्यासाठी मुंबईकरांची संख्या खूप वाढली आहे. वनक्षेत्रात प्लॅस्टिक बाटल्या वा अन्य कचरा न फेकता नागरिकांनी सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
– योगेश महाजन, वन परिक्षेत्र अधिकारी, नॅशनल पार्क (बोरिवली)
दररोज पासच्या माध्यमातून 30 ते 35 हजार महसूल जमा
नॅशनल पार्कमध्ये नियमित मार्ंनग वॉकसाठी येणाऱया पर्यटकांना वार्षिक पास दिला जातो. हा पास घेणाऱयांची संख्या वाढली आहे. पास खरेदीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून त्या माध्यमातून दररोज 30 ते 35 हजार रुपये महसूल जमा होत आहे.
मॉर्निंग वॉकर्ससाठी वार्षिक शुल्क व वेळ
सर्वसाधारण नागरिक – 367 रुपये
वेळ ः पहाटे 5 ते सकाळी 7.30 वाजेपर्यंत
ज्येष्ठ नागरिक – 37 रुपये
वेळ ः पहाटे 5 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत