दुपारी उन्हाचा चटका; संध्याकाळी वादळाचा दणका

छाया - सचिन वैद्य

सकाळी ढगाळ आणि दुपारी कडक ऊन अशा कात्रीत सापडलेले मुंबईकर प्रचंड उकाडय़ाने हैराण झाल्याचे चित्र आहे. आणखी काही दिवस मुंबईकरांचा घामटा निघणार असून पुढील 24 तासांसाठी ढगाळ हवामान आणि वादळी वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सकाळी ढगाळ, दुपारी उन्हाचे चटके तर संध्याकाळी वादळाने दणका दिला. दिवसभर आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांवर गेल्याने उन्हाचे चटके आणि अंगातून घामाच्या धारा अशी स्थिती मुंबईत आहे.

आज कुलाबा येथे 33.9 अंश सेल्सियस, तर सांताक्रुझ पेंद्रात 35.5 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. उकाडा राहाणार असल्याचे कुलाबा वेधशाळेच्या सुषमा नायर यांनी सांगितले.

उकाडय़ामुळे आजार वाढले

कडकडीत ऊन, घामाच्या धारा आणि प्रचंड उकाडा यामुळे मुंबईकर हैराण असून समुद्रकिनारा जवळच असल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक आहे. या असह्य उकाडय़ामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, डोळे कोरडे होणे, पोटदुखी अशा तक्रारी घेऊन मुंबईकर दवाखान्यांमध्ये गर्दी करत आहेत, अशी माहिती कांदिवली येथील फॅमिली फिजिशीयन डॉ. संजीव कुदळे यांनी दिली.